Minutes of Meeting |
तोच चंद्रमा नभात ... ८ सप्टेंबर
तारिणी ... राहुल लाळे
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या "सहवास गणेशोत्सवाची" तिसरी आणि अंतिम माळ काल *बाबूजी - सुधीरजी फडके यांच्या संगीत व गायनावर आधारित "तोच चंद्रमा नभात ... बाबूजी एक स्वरगंधर्व " या एका अप्रतिम दृकश्राव्य ( ऑडिओ-विझ्युअल) कार्यक्रमाच्या माध्यमातून तारिणी व राहुल लाळे यांनी सजवली.
बाबूजींच्या अफाट आणि विस्तीर्ण अशा सांगीतिक कारकिर्दीचा आढावा केवळ दीड तासांच्या मर्यादित वेळेत घ्यायचं शिवधनुष्य तारिणी व राहुल या जोडीने लीलया पेलून उपस्थित रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
चांद, चंदामामा, चंद्रम, चंदाराजा, चंद्रकोर, चांदोबा, चांदोमामा -चंद्रमा, अशी लडिवाळ नावे आपल्या गाण्यांमध्ये आढळतात. अशाच अनेक यशस्वी चंद्रगीतांमध्ये मनाच्या स्वरलिपीत कोरले गेलेले एक अवीट गोडीचं गीत म्हणजे - ‘तोच चंद्रमा नभात' या कवयित्री शान्ता शेळके यांनी रचलेलया आणि गायक-संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरसंगीतातून उमललेलया अप्रतिम गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बाबुजीच्या स्वर्गीय आणि आर्त आवाजाने आपल्याला एकांतात नेऊन आपल्या प्रिय व्यक्तीच्या समीप नेऊन कधी ठेवलं, हे रसिकांनाही कळालं नाही.
तोच चंद्रमा नभात हे यमन रागातलं गाणं , बाबूजींनी यमन रागाबरोबरच देस , तिलककमोद , धानी ,भूप, भीमपलास,वसंत, मल्हार, सोहनी आणि केदार इत्यादी रागांवर आधारित अनेक गाणी केली पण यमनची मजा काही औरच !! "पराधीन आहे जगती", "धुंदी कळ्यांना", , कारे दुरावा" आणि अशी अनेक यमन रागावर आधारित बाबूजींनी बांधलेली सुरेख गाणी ऐकताना रसिकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
बाबूजी .. म्हणजे सुधीर फडके .. मराठी संगीतातील एक अविभाज्य नाव .. जगभरातील मराठी रसिकांच्या मनातला - भावविश्वातला एक हळवा कोपरा आपल्या स्वर्गीय आवाजाने भारावून टाकणारे आणि स्वरतालबध्द तसंच कायम गुणगुणत रहावं असं वाटणाऱ्या चाली बांधणारे - गेल्या अनेक पिढ्यातील रसिकांच्या गळ्यातील ताईत व अनेक उदयोन्मुख गायक-गायिकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गुरू - तरीही ते किती विनयशील होते हे त्यांची अशोकजी रानडेंनी घेतलेल्या मुलाखतीतून पाहायला मिळाले. आपले प्रथम संगीत गुरु पं वामनराव पाध्यांकडे शिकलेले आता आठवत नाही हे सार्वजनिक ठिकाणी सांगायला मोठं मन लागतं .
बाबूजींनी संगीतबद्ध केलेले ८४ मराठी चित्रपट, त्यातील एकूण गाणी ५५५, २२ हिंदी चित्रपट व त्यातील अनेक गाणी, ११४ चित्रपटेतर गीते व गीतरामायणातील ५६ गाणी… गायक या नात्याने बाबूजींनी अन्य संगीतकारांकडे चित्रपट व चित्रपटेतर गायलेली एकूण गाणी ५११ - हे सर्व बाबूजींच्या अफाट गुणवत्तेची, संगीतावरच्या निष्ठेची आणि मेहनतीचीही साक्ष देतात. राहुल ने यातील जुनी चित्रपटगीते , भावगीते , भक्तिगीते, बिगर चित्रपट गीते , स्फुर्तीगीते , युगल गीते , विरह आणि प्रेम गीते अशी ७५ हुन अधिक गाण्यांच्या झलक दाखवत व तारिणीने त्या प्रत्येक प्रकारातील बाबूजींचा वेगळा विचार रसिकांसमोर सामोरा मांडत बाहेर पाऊस पडत असताना त्यांना स्वररसात न्हाऊन टाकले.
बाबूजींची ही ताकद, ही तयारी सहज आलेली नाही - त्यामागे त्यांची खडतर तपश्चर्या होती , अभ्यास होता - त्यांच्या गाण्यातील स्पष्ट शब्दोच्चार हा अट्टाहास न वाटता गीतातील भाव , त्यातील अर्थ स्पष्टपणे रसिकांपर्यंत पोचावा - त्यातली आर्तता मनाला भिडावी यासाठी होता हे या कार्यक्रमातून तारिणी- राहुल यांनी सांगितलं . एक कडक शिस्त, आपुलकी, प्रेमभाव आणि शिस्तीमुळे सुधीर फडके हे घराघरातल्या प्रत्येकाचेच बाबूजी झाले आणि ललित संगीताबाबत ठाम धारणा, संगीताशयात नि:शंकता,सहज गुंफली जाणारी स्वरमाला ,आवाजातला नाजूक लगाव आणि विचारपूर्वक संगीतरचना यांमुळे जाणकारांच्या मनांत ही त्यांना मानाचं स्थान होतं हे या कार्यक्रमातून प्रकट झालं.
या कार्यक्रमातून बाबूजींची चित्रपटीय दृष्टी त्यातून निर्माण झालेली चित्रपटाची कथा पुढे नेणारी प्रसंगाचे नेमके भान व वास्तवता राखणारी गाणी कशी निर्माण झाली -कवितेतील कवित्व जपून उत्स्फूर्ततेला कलात्मकतेची जोड देऊन तरल भावनांचे सादरीकरण बाबूजी कसे करायचे हे तारिणीने प्रकट केले. त्यांचे स्पष्ट शब्दोच्चार, आशयाशी प्रामाणिकता ,देहबोलीचा परिणाम, आवाजातील स्थिरता, सुरेल -श्रवणीयता राखून गायन हे नेहमीच प्रमाण कसं असायचं , गदिमा आणि आशा भोसले यांच्याबरोबरची त्यांची जमलेली जोडी , भीमसेनजी, माणिक वर्मा - पं जितेंद्र अभिषेकी - पं वसंतराव देशपांडे - सुरेश वाडकर - जयवंत कुलकर्णी -रवींद्र साठेंपासून अगदी रफी - किशोरकुमार , मुकेश, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, जयवंत कुलकर्णी, अनुराधा पौडवाल श्यामराव कांबळे, प्रभाकर जोग,सेबॅस्टिअन आणि तबलजी केशवराव बडगे, चंद्रकांत नाईक, अण्णा जोशी, ढोलकीवादक गंगावणे अशा अनेकांबरोबर त्यांनी केलेलं काम.. . स्वतः संगीतकार असूनही राम फाटक, मा कृष्णराव , दत्ता डावजेकर, यशवंत देव, राम कदम , प्रभाकर जोग, मधुकर गोळवलकर , मनोहर कवीश्वर , श्रीनिवास खळे ,वसंत प्रभू, वसंत देसाईं आणि अगदी आपले चिरंजीव श्रीधरकडे त्यांनी म्हणलेली गाणी हे सर्व राहुलने लिहिलेल्या संहितेतून व तारिणीने केलेल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना कळालं .
बाबूजींच्या एरवी धीरगंभीर बाजापासून वेगळ्या लावणीच्या बाजातही बाबूजींनी कशी धमाल उडवली हे पाहून उपस्थित खुश होऊन गेले. लता मंगेशकर यांच्याबरोबर असलेले कथित तणाव - पत्नी ललिता देऊळकर फडके यांचं गाणं बंद करणं ही अफवा कशी होती हे त्यांनी बाबूजींनी बरोबर गायलेल्या गाण्यांच्या चित्रफितीतून उपस्थित रसिकांना या कार्यक्रमातून कळालं.
बाबूजींचा कुठलाही कार्यक्रम गीतरामायणाचा उल्लेख झाल्याशिवाय पूर्ण होत नाही - या कार्यक्रमाचा शेवटही राहुल-तारिणी यांनी गीतरामायणाची भावपूर्ण गाणी सादर करून केला .
रो प्रतिभा जगदाळे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तारिणी आणि राहुल यांची ओळख करून दिली तर चार्टर प्रेसिडेंट शेखर टाकळकर यांनी आभारप्रदर्शन केले.
सहवास गणेशोत्सवाची तिसरी माळ अत्यंत भावपूर्ण आणि प्रसन्न वातावरणात संपन्न झाली आणि प्रेसिडेंट अजयजींनी सोडलेला संकल्प पूर्ण झाला
रो राहुल लाळे
सेक्रेटरी २२-२३
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास |